"येस कम इन...!!"
आणि सगळ्यांच्या अनोळखी नजरा त्या दारात उभ्या असलेल्या २ पोरांना कुतुहलाने न्याहाळत होत्या. खरंतर बोर झालेल्या लेक्चर मधून त्यांना या निमित्तानं थोडासा दिलासा मिळाला असेल खरा, असो..! दारात कोण उभं आहे आणि आता वर्गात अजून कोण नवीन आलंय हे बघण्यासाठी सगळे मानावाकडया करून दाराकडं बघत होते.
खरंतर कॉलेज सुरु होऊन २० दिवस झाले होते पण त्याच्यासाठी हा पहिलाच दिवस होता.काळ्याकुट्ट फळ्यावर सरांनी काहीतरी आडव्या उभ्या रेषा मारून काहीतरी आकृत्या म्हणा किंवा Drawings काढल्या होत्या.एका हातात लांबडी पट्टी आणि एका हातात खडू घेऊन सर उभे होते तर काही पोरांनी मोठा प्लायवुड चा चौकोनी तुकडा बेंचवर ठेऊन त्याला Drawings शीट्स आणि आडव्या उभ्या रेषा मारायला काहीतरी जोडलं होतं आणि काही जण दुसरं कसं काढतायेत हे पाहत होते,उभा राहून...!!
हे अजून दारात उभं राहून वर्गच न्याहाळत होतं, एवढ्यात पश्या बोलला,"जा बस जा,आतमधी..!!"
आणि एवढ्या वेळ पश्याच्या मागं उभारून चोरट्या नजरेने वर्ग न्याहाळत बसलेला एक सावळं पोरगं थोडं बाजूला सरून तेथेच पायाकडं बघत उभा राहिलं.सुरुवातीला पश्या दारात उभा असलेला सगळ्यांना दिसला पण हे जरा पश्याच्या मागं आपण दिसू नये या बेतानं उभं होतं.
पाठीवर नॉर्मल बॅग पेक्षा मोठी काळी बॅग ,साधारणतः गावाकडं वापरतात तशी ढगाळी काळी पॅन्ट आणि त्यालाच शोभेल असा पांढरा शर्ट जो कि खालून चौकोनात शिवला होता, पायात लॅन्सर चे बूट जे कि कॉलेज ला जाणारे म्हणून मित्राने २० दिवसापूर्वी घेऊन दिले होते आणि डोक्यावर चापून चोपून बसवलेले केस...!!
पश्या परत बोलला " जा बस जा आतमधी ,घाबरतोस कश्याला..??"
आणि पश्यानं त्याचा हात धरला आणि सरळ आतमधी शिरला , काय चाललंय हे सरांसकट सगळी पोरं कावरीबावरी होऊन बघत होती. पश्यानं शेवटच्या नेऊन त्याला बसवला आणि त्याच्या कानात काहीतरी बोलुन सरांना जातो म्हणून निघून गेला...!!
गावाकडच्या कॉलेज मध्ये जिगरी दोस्त असलेला लास्ट बेंच इथं त्याला पहिल्या दिवशी अनोळखी वाटत होता...!! शेवटच्या बाकावरचा आपलेपण त्याला जाणवत नव्हता जाणवणारही कसा हो,पश्या सोडला तर सगळे त्याला अनोळखी च होते आणि आपलेपणा निर्माण व्हायला आपली माणसं लागतात...!!
एवढ्यात कानावर शब्द पडले ,
शेजारच्या बेंचवर बसलेला एक गोरठेला मुलगा त्याच्या पुढच्या बेंचवर बसलेल्या पोराला विचारत होता....,
"भावा, ती फर्स्ट बेंचवर बसलेली कोण आहे रे...??"
एवढ्यात त्याच्या बोलण्याला मधेच तोडत गुड्डीने प्रश्न केला,"दादा ती वैनीच होती ना..??"
गावाकडं घराच्या वऱ्हांड्यात चांदुमामाच्या प्रकाशात आणि चांदण्यांना सोबत घेऊन तो कॉलेजच्या आठवणी रंगवत बसला होता..पोरांना घेऊन...!!
"नाही तसं काही नाही..." तो बोलला...
"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!"
-क्रमशः
©सोमनाथ रा. मोहिते
