Wednesday, 30 May 2018

Campus स्टोरी ( Part 2)



"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!"

"हो सांगतो पुढं हळूहळू...हे तर ऐक..!! आणि संत्या त्याची स्टोरी सांगू लागला...

" पोरांनो, जरा इकडे लक्ष द्या..!!" असं बोलून सरांनी सगळ्यांच लक्ष त्यांच्याकडं वळवून घेतलं. सर Procedure सांगायचे आणि पोरं सरांची जमेल तशी कॉपी करायचे. सरांनी सगळ्यांना आता तुम्ही काढा म्हणून सांगितले. तो किलकिल्या डोळ्यांनी सर काय सांगतायेत हे पाहत होता. एवढ्यात त्याला जाणवलं कि सर त्याच्याच कडे येतायेत, यानं पुन्हा मुंडी खाली घालून काहीतरी करतोय याचा बळंच दिखावा करू लागला.सर जवळ आले आणि त्याला बोलले...

"आज पहिलाच दिवस का कॉलेजचा ?? "
"हो" तो बोलला.
"Drawing Sheet , Drafter वगैरे आणलंय का.??"
"नाही"
"बरं ठीक आहे,तो पुढचा कसं काढतोय ते बघ  आणि उद्या मला हे सगळं साहित्य पाहिजे ."
"हो सर "

एवढी चौकशी करून सर निघून गेले.Drafter काय असतंय याला बापजन्मी माहित नव्हतंय. Drawing sheet माहित होतं, ते बी यानं शाळेत असताना Elementary आणि Intermediate च्या परीक्षा पास केल्या होत्या,ते बी "C" ग्रेड नी..!!

ज्यांच्या आई-वडिलांना त्यांचा मुलगा-मुलगी Engineer व्हावा अशी इच्छा असते,त्या पोरांना Admission घ्यायच्या अगोदर पासून माहित असतंय पुढे काय लागणार आणि काय नाही..इथं सगळं अनावधानानीच घडत होतं. याला करायचं होतं B.A. ...!
असो ,याबद्दल आपण नंतर बोलूच...!!
त्या प्लायवूड वर रेषा मारायला जोडलेलं यंत्र कदाचित Drafter असावा असा यानं अंदाज बांधला. आणि पुढचा काय काढतोय हे बघण्यासाठी पुढच्या बाकाशेजारी जाऊन उभा राहिला. सगळं अनोळखीच..!!
          सुरुवातीला जी पोरं उभा राहून दुसरी कसं काढतायेत हे पाहत होती कदाचित ते आजच आली असावीत असा यानं अंदाज बांधला.
              "बस कि भावा,इथं.. उभा का राहिलास..!! ज्याच्या शेजारी उभा होता तो मुलगा याला बोलत होता.
 "हा " म्हणून तो त्याच्या शेजारी बेंचवर बसला.           "पहिलाच दिवस वाटतं, कॉलेजचा ? "
"हा,आजच आलोय."
" नाव काय रं तुझा भावा..??              
 "संतोष"                  
 "तुझं?"
 "अक्षय "
              एवढं बोलून अक्षय drawing काढण्यात रमून गेला.थोड्या वेळ झाल्यानंतर त्याचं वर्गात मन लागंना,म्हणून त्यानं Drawing काढणाऱ्या मित्राला विचारलं,
                   
 "किती वाजता संपतो रे हा तास ?"
 "१०.३० "
 "बरं...!! "

तो परत येऊन मागच्या बेंचवर येऊन बसला.त्यानं खिशातून Nokia चा ३११० मोबाईल काढला आणि बेंचखाली धरून टाईम बघितला.त्यावेळी नुकतंच Android फोन वापरायला सुरुवात झाली होती.१०.१० झाले होते. अजून २० मिनिटं करावं काय म्हणून तो इकडं तिकडं बघत होता.कुणी दुसऱ्यानं काढलेल्या शीट्स मध्ये डोकावून बघत होतं तर कुणी शीट्स काढण्याच्या नादात गप्पा मारत होतं. पुढच्या बेंचवरची मुलं सरांना घेऊन काहीतरी विचारत होती आणि सर Drafter घेऊन त्यांना शिकवत होते. मधल्या बेंचवरची पोरं दुसऱ्या पोरांकडून शिकून घ्यायच्या भानगडीत होती. आणि मागच्या बेंचवरची पोरं मात्र नेहमीप्रमाणं टिंगलटवाळी करण्यात व्यस्त होती, त्यांना त्या शीट्स शी काही एक संबध नव्हता ,कामापुरतं येतंय ना बस झाला.त्यांच्या गप्पा चालल्या होत्या पण अभ्यासाच्या नाही,तर 'पोरींविषयी'..!!
तू तिला ओळखतो ? ती किती भारी दिसती राव? वैगेरे वैगेरे...!! काही पोरं बळंच जोक मारून बळंच हसत होती.
                 उजव्या साईडच्या बेंचवर बसलेल्या पोरी गप्पा मारण्यातच दंग होत्या.फर्स्ट बेंचवर बसलेली पोरगी नीटशी दिसत नव्हती पण ती मागं वळून बोलत होती.हा डाव्या साईडच्या लास्ट बेंचवर होता,त्यामुळं त्याची ,तिच्या टपोऱ्या डोळ्यांवर अन मानेवर रुळणाऱ्या केसांवरून ओझरती नजर फिरून गेली.नीटसा चेहरा काही दिसला नाही.
            पण,या सगळ्यात त्याला एक गोष्ट खटकली मधल्या रांगेत बसलेली २ पोरं यांच्याकडे बघून सारखी हसत होती. याला राहून राहून खजील झाल्यासारखं वाटत होतं. हसणाऱ्या पोरांकडं बघत यानं ठरवूनच टाकलं .पश्याला सांगून यांना चांगलाच फोडतो.
              इतक्यात पोरांची बॅगा भरण्याची लगबग सुरु झाली.१०.३० वाजत होते .सर आपली पुस्तकं ,खडू ,लांबडी पट्टी घेऊन निघून गेले.पोरांची बाहेर पडण्याची घाई जाणवत होती त्यानं आपली भली मोठी सॅक उचलली आणि बाहेर पडू लागला. दारातच पश्या उभा होता.....

-क्रमशः...

तळटीप: यातील सर्व पात्र काल्पनिक आहेत,वास्तवाशी काही संबध आल्यास निव्वळ योगायोग समजावा..!!😜

©सोमनाथ रा.मोहिते


No comments:

Post a Comment

Campus स्टोरी ( Part 2)

"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!" "हो सांगतो पुढं हळूहळू...हे तर ऐक..!!...