Saturday, 2 December 2017

Engineering Life




"यावर्षी Engineers Day ला सादर केलेली कविता, जरा उशिरानच Post करतोय...!!"
मनातल्या भावना थोड्या शब्दातून...!!😊


Engineering च लाईफ असंच असतंय...!! 😊

चुकून आलो Engineering ला म्हणून सुरु केलेला
प्रवास अर्ध्यातून सोडून जायचं नसतंय,
Last Bench किस्से पुढच्या पिढीला हक्कानं सांगायचं असतंय ,
साला Engineering च Life असंच असतंय..!!💓


सबमिशनचा सण इथं उत्साहानं साजरा करतात,
HOD सरांच्या सहीसाठी पाय मोकार चकरा मारतात...!😁
किशोरदा, अरजित सिंग,मोहम्मद रफी,
या काळात जरा जास्तच आपलेसे वाटतात..!!
सबमिशनच्या काळात इथं कुणी-कोणाचचं नसतंय,
साला, Engineering च Life असंच असतंय..!! 😍


प्रेमाचं वारं ४ वर्षात एकदातरी येतंय,
Lecture ची जागा मग Canteen घेतंय..!
न परवडणारी Cofee मात्र आपलीशी वाटते,
मित्रांची Party मात्र वडापावच्या गाड्यावरच भागते...!😍
कळत-नकळत शेवटी प्रेमात दगा-फटका होतंय,
हे आपलं काम नाही म्हणून बेणं माघारी येतंय..!
Nice Dp म्हणून सुरु केलेल्या Love Story त Block च होऊन बसतंय,😂😍
साला, Engineering Life असंच असतंय..!!😉


चलन मिळवण्याची-भरण्याची तऱ्हा वेगळीच असते,
अनोळख्या गर्दीत Crush ला बघून मात्र दातखिळीच बसते...! 😘
परीक्षेच्या काळात सगळे, कट्टर मित्र होत्यात,
भावा, Passing पुरतं दाखव एवढ्यात काटेकोरमामा निघून जात्यात...!!😎
दीड तास शांत बसलेला गंगाधर शेवटी,
शक्तीमानच होतंय,😇
साला Engineering च Life असंच असतंय...!!😐


मित्रांच्या दुनियादारीत हे college आपलंच असतंय,
पोरगं Lecture ला कमी अन कट्टयावरच जास्त दिसतंय..!! 😎😍
मोरपिसासारख्या जपलेल्या आठवणी,
कॉलेज संपल्यावरच कळतात...
आठवणींचा Album मात्र सर्वजन आवर्जून चाळतात...!!😍😘
१००% Engineer नाही झाला तरी,९०% माणूस व्हायचं असतंय,
साला, Engineering च Life एवढं सुंदर असतंय..!! 😍


शेवटी कसंय ना दोस्ता,
सळसळत्या रक्तात जगाला बदलण्याची ताकद लपलीये...
साला, इथं तर आख्खी Story च आपलीयं...!!😍😘


© सोमनाथ रा. मोहिते
#Campus_Stories...😊
#१५ सप्टेंबर


Tuesday, 9 May 2017

राजगड



"राजगड" म्हणजे आयुष्य..!!

इतक्यात अचानक संतुदाची लायब्ररी वर धाड पडली . अन ठरला बेत.."राजगड" सर करण्याचा, चंद्र अन चांदण्यांच्या सोबतीनं..!!
ती मंथरलेली रात्र कदाचित यासाठीच फितूर झाली असावी..!! अन झाला अट्टाहास "सूर्यादय" पाहण्याचा..!!

खरंतर चांदुमामाच्या सोबतीनं गड जगायला चाललो होतो अन नकळत या रांगड्या सह्याद्रीच्या मनापासून स्वाधीन झालो होतो..!! गेल्या कित्येक मोहिमा चांदुमामाच्या मायेच्या सावलीत पार पाडल्या होत्या , आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी मात्र काळजात साठवून ठेवल्या होत्या..!!

रातकिड्यांचा किर्रर्र आवाज , रात्रीची ती हवीहवीशी निरव शांतता चिरून टाकत होता.कधीकधी या डोंगरदर्यातला हा काळोख खायला उठतो..!!
आयुष्यात पहिल्यांदा आकाशगंगा (Milky Way)पाहिली असेल कदाचित...!!
इतिहास जगत पाय चोरवाटेने पद्मावती माची जवळ करत होते..!! पद्मावती देवीचं दर्शन घेऊन सुरु झाली खलबतं.! तेज्या अन संतुदा नं इतिहास नव्यानं जगायला अन पाहायला शिकवलं..!!

त्या चांदुमामाच्या निरभ्र छायेखाली "राजगड" इतिहास जगायला शिकवत होता..!!
शुक्राची चांदणी हळूहळू वरती येताना दिसू लागली अन थकलेले पाय आपसूक बालेकिल्ल्याकडे धाव घेताना जाणवू लागले..!!
" सुर्यादय " बघायला नाही तर "जगण्यासाठी" हा अट्टाहास..!!

पूर्वेकडे हळूहळू तांबूस रंगाची लय उमटायला लागली होती. सुवेळा माचीचा बेलागपणा दृष्टीस पडत होता.पक्ष्यांची किलबिल कानी पडत होती.बहिणाबाईंच्या कवितेनुसार , त्या डोंगर दर्यात सूर्यनारायण नव्याने जन्म घेत होते.जसे पेरणीनंतर पेरलेल्या बियांना ओलावा भेटला कि अंकुर जमिनीची छाती चिरून बाहेर येतो , या उघड्या आकाशाला जगायला..!! तसेच सूर्यनारायण हळूहळू आपले अस्तित्व जगाला सांगायला तयार होत होते. हा-हा म्हणता तो तांबूस रंगाचा गोळा हे अवघं आसमंत काबीज करण्याच्या तयारीत होता अन आम्ही जमेल तेवढा हा न संपू वाटणारा क्षण-सुर्यादय डोळ्याच्या खोबणीत साठवून ठेवण्याच्या निष्फळ प्रयत्नात होतो..!!
रात्रभर चाललेला क्षीण आपसूक कापरासारखा उडून गेला..!!
त्या सूर्याचा उदय आम्हाला आमच्या जीवनात नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद मात्र जागवून , हे उभं विश्व गिळंकृत करण्याच्या तयारीला लागला..!!

काहीतरी गवसल्याच सुख चेहऱ्यावर घेऊन स्मित हास्य करत , पाय नव्या जोमानं गड उतरायला घाई करत होते..!!

©सोमनाथ रा. मोहिते

Monday, 20 February 2017

" बाप "

                               
                     
         सूर्य मावळतीकडं झुकला व्हता . हळूहळू कडुसं पडायला लागलं व्हतं..! त्याचा तांबडाशार रंग अवघ्या सृष्टीला गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात व्हता . अगणित सौंदर्याने नटलेला सूर्यास्त आणि त्यामुळं नानाविध रंगाच्या छटा सर्वदूर पसरल्या जात व्हत्या . हळूहळू सूर्यनारायण अस्ताला चालला व्हता .. नव्या प्रारंभाची पहाट घेऊन येण्यासाठी.!!
माझ्या छोट्याश्या डोळ्यांत त्या रंगाच्या छटांचे प्रतिबिंब पडले होते . तो अस्ताला जाणारा भास्कर दरवेळेस नव्या उमेदीने जीवन जगण्याचा मूलमंत्र देऊन जात व्हता , एवढं मात्र खरं..!!

         त्यादिवशी सोमवार व्हता .. बाजाराचा वार. आज दुपारून शाळेला सुट्टी असते. त्यादिवशी चा बाजार हळूहळू वसरायला लागला व्हता . मी आपला शाळेची कापडं..खाकी पॅन्ट अन पांढरा सदरा घालून हापश्यावर बसून भाऊंची वाट बघत बसलो होतो . आम्ही आमच्या वडिलांना " भाऊ " म्हणून संबोधतो.. रस्त्यावरून हळूहळू बैलगाड्यांची , वाहनांची , शेळ्या , मेंढ्या यांची गर्दी हळूहळू वाढायला लागली व्हती. सोमवार चा आठवडी बाजार उरकून व्यापारी आपापल्या गावाच्या वाटेला लागले होते .
     
          बाया , डोईवर माळव्यांच्या पिशव्या घेऊन चालल्या व्हत्या . अन त्यांच्या हाताला धरून चालणारी त्यांची बापडी.. त्यांची पोरं..घोडीशेवेचा तुकडा नाचवत-नाचवत आनंदाने उडया मारीत चालली व्हती . मी आपला हे सगळं किलकिल्या डोळ्यांनी भाऊंची वाट बघत बसलो व्हतो..तेवढ्यात एका पोराचा रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला . ते आपल्या आईला रडून-रडून सांगत व्हतं...
       
         "आए , मला आज बी नवा शरट घेऊन का नाय आली , गेलं चार दिस ते मास्तर मला कोंबडा बनायला सांगत्यात ..!! "
       
         एवढं बोलून त्या पोराचा भोंगा आजून वाढला .रस्त्यावरुन चाललेल्या आया-बाया त्या पोराच्या तोंडाकडं बघायला लागल्या..नाकातला शेंबुड सगळा खाली येतंय हे बघून त्या पोरानं आपल्या हाताच्या पालथ्या मुठीनं शेंबूड पुसला..!
शेजारच्या बाया बघायला लागल्यात हे बघून त्याच्या आईनं त्याला दरडावून सांगितलं ...

         " सांगत्ये , तुझ्या बापाला आणायला  उद्या..तालुक्यावून..! त्यांना तर जरा बी काळजी नाय पोराची.."
       
         हे ऐकून शेजारच्या बाईनं सहमतीदर्शक मान डोलावली हे बघून त्याच्या आई बोलली..
       
         " नाहीतर काय..!! "
       
हे ऐकून , पोरगं पाय आपटीत आईच्या पुढं निघून गेलं.

        त्यांचं संभाषण ऐकून नकळत माझ्या चेहऱ्यावर हास्याची कणाद उमटली , पण दुसऱ्याच क्षणाला माझी नजर माझ्या शरटावर पडली..आज सकाळीच माझ्या बी शरटाची बटणं पडली व्हती . सकाळीच आईनं दोन वेगवेगळ्या रंगाची बटणं माझ्या सदऱ्याला बसविली व्हती..! साळात माझा निम्मा टाईम तर बटणं लपविण्यात गेला व्हता..!
इतक्यात , रस्त्यावरून आमच्या तात्यांचा आवाज कानावर पडला .. माझ्या विचारमंथनातून माझं लक्ष विचलित झालं ..अन मी तात्याला ईचारलं.,

       " तात्या , भाऊ दिसलं का व बाजारात..? "
     
       " नाय रं , महिड्या ..मघाशी दिसला व्हता बाजारात , परत नाय बाबा नजरं पडला..बसला असलं नजीरमामापाशी.."
     
       " बरं.."
     
       एवढं बोलून तात्या निघून गेलं . हळूहळू अंधार पडायला लागला व्हता . रस्त्यावरची रेलचेल हळूहळू कमी व्हायला लागी व्हती . बैलगाड्यांच्या  बैलांच्या गळातील चंघाळया ( घुंगरं ) एक विलक्षण नाद निर्माण करून त्या रम्य संध्याकाळची शोभा अजूनच वाढवीत व्हती . मघाच्याधरणं पोरांनी शंभर येळा मला " चिरघुडी " खेळायला बोलावलं व्हतं.. पण मी नाय गेलो ..मी आपलं भाऊंची वाट बघत बसलो व्हतो..!!
     
       आई आज लवकरच भाकरी-कालवनाला लागली व्हती . तिचा स्वयंपाक कदाचित झाला असावा .देवापुढं दिवा लाऊन , तिनं ओट्यावर अंथरून टाकून भाऊंची वाट बघत बसली व्हती..तिनं ओट्यावरूनच मला हाक मारली ,
     
        " ये महिड्या , अजून आलं कि नाय ती ..कवाच्याधरणं वाट बघत बसलाय.."
     
        " आए , भाऊ काय दिसना झाल्यात..म्या तात्याला पण ईचारलं पण ना ती पण नाय दिसलं म्हणलं..! तुला काय सांगून गेलतं का ? "
     
        " तू हु म्होरं ..मी आलू पाठीमागनं ..म्हणलं.! काय माहित कुठं बसलाय हा माणूस..तू ये जेऊन घे..सकाळधारनं काय खाल्लं नसल "
     
        " थांब , थोड्या येळ वाट बघतो अन येतो.."

एवढं बोलून , आई ओट्यावरून घरामधी गेली . कंदील अन चिमणी घेऊन आली..रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात चिमणीत त्याल भरत बसली.मी आपला शरटाची कॉलर तोंडात चघळत परत भाऊंची वाट बघत बसलो.तेवढ्यात त्या अंधारातून एक धोतार अन सदरा घातलेली सावली माझ्या दिशेनं हळूहळू जवळ येतंय हे मला जाणवलं ..मला वाटलं भाऊ आलं.. मी आपलं डोळं ताणून भाऊंची वाट बघत व्हतो. जशी-जशी सावली जवळ आली तशी मला जाणवलं ते भाऊ नसून आमचं आबा व्हतं. माझा हिरमूड झाला.हळूहळू अंधार वाढायला लागला व्हता , तरी अजून भाऊंचा पत्ता नव्हता . तेवढ्यात कुणीतरी खांदयावर घागर घेईन माझ्याच दिशेनं येताना दिसलं.. मी हापश्यावर बसलो व्हतो ना..! जवळ आल्यावर कळलं बाळूमामांचा मोन्या खांद्यावर घागर पाणी भरायला आला व्हता .जरा आतंरावरून त्यानं मला हाक मारली ,

          " काय गब्या , हपश्याला राखण भसलास व्हय ..?? "
       
          अन हसायला लागला.मला राग आला.
       
 " नाय रं , लंबुळया तुझीच वाट बघत बसलो व्हतो.."

          एवढ्यात ते हापश्यावर पोचलं व्हतं . मी आपला खाली उतरलो.
       
          " नाय रं , हापश्यावर बसलाय म्हणलं पाणी भरून देतोय का नाय..म्हणून म्हणलं .."
       
         अन परत जीभ काढून हसायला लागलं..!
       
         " माझ्या काय बापाचा हापसा हाय व्हय , च्यायला काय बी बोलतंय..! "
       
         मग थोड्यावेळ झाल्यावर मीच त्याला ईचारलं ,
       
         " मोन्या , आज गेलता का जनावरांच्या बाजारात... बापुसंग..? "
       
         " व्हय , गेलतू कि...का रं ."
       
         " आमचं भाऊ , दिसलं का जनावरांच्या बाजारात मंग.." परत त्यानं चेष्टनं बोलला,
       
         " तुझं म्हातारं व्हय , दिसलं व्हतं कि..बैलं घेऊन उभा राहिलं व्हतं बाजारात..पाटलाचा व्यापारी पण व्हता संग...आज तुमची बैलं ईकायला नेलती व्हय..! "
       
          " व्हय , सकाळीच नेलती...आता सकाळची रात झालीय..तरी भाऊ अजून आलं नाय राव..आमचं.."
       
          एवढं बोलून  मी , आपल्या पायाच्या बोटांकडं बघत उभा राहिलो..मोन्यानं मघाच्याधरणं हापसा आपटीत एक घागर भरली व्हती..आणि त्यांनी दुसरी घागर भरायला लावली,अन बोलायला लागला...,
       
          " म्हणून इथं थांबलास व्हय..दुपारी मी थांबलो व्हतो..थोड्या येळ भाऊ पशी.. एका व्यापाऱ्यानं लय पाडून मागितली राव तुमची बैल..अन त्यांचा चेहरा पडला.."
       
          " मंग.."
       
          " मंग काय , ते येड्याभोकाचं व्यापारी लय पाडून मागत व्हतं.. म्हणून सौदा नाय जमला.. ते दीड शहाणं म्हणून गेलं.. तुमच्या बैलाला काय सोनं लागलंय व्हय.इका कुणाला इकायचा ती..अन निगुण गेलं..!" मोन्या बोलत व्हता ,
       
          " त्याला काय माहित बैलं म्हंजी शेतकऱ्यांच्या जीवाला सोन्यापेक्षा सुध्या लय खास असत्याती.. घरात जर बैल अन गाया नसतील तर त्या घराला घरपण येत नाय..! तुला माहितीय महिड्या , बैल म्हणजे मातीतलं कोहिनूर असत्याती..!"
       
           एवढं बोलून मोन्या थांबला , मोन्या बोल्तानी भावूक झाला व्हता..मी त्येच्या चेहऱ्याकडं बघतच बसलो..त्याला जनावरांविषयी जरा जास्तच माहिती व्हती . त्याचं बापू बाजारात शेळ्यांचा व्यापार करत व्हतं . त्यामुळं त्याला थोडं फार त्यातलं गिन्यान व्हतं..!
         
           " मंग पुढं..? "
         
           " मी तिथून निघून गेलो , अन परत थोड्या येळाने घरी आलू.. " त्याची घागर भरून पाणी सांडायला लागलाय हे त्याच्या ध्यानात आलं , त्यानं घागर बाजूला काढली अन बोलला
         
           " नगं , काळजी करू..येत्यानं तुमचं भाऊ..या व्ययात कुठं जाणारंय म्हातारं..! "
         
           एवढं बोलून त्यानं एक घागर खांदयावर अन एक हातात घेऊन निघून गेला जाताना बी पाणचट विनोद करून गेलं , मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं थोड्यावेळ बघत बसलो ..हळूहळू ते रात्रीच्या अंधारात गडुप झालं..! एवढ्यात घरून परत आई चा आवाज आला ,
         
           " आलं का नाय ती  , नसलं दिसत तर ये , भाकर खाऊन घे..येत्यान ती "
         
           " बरं , आलो..ताट वाढ."
         
           आई परत बारक्या घरात गेली . मी थोड्या येळ भाऊंची वाट बघितली , अन जड पावलाने घराकडं चाललो. पायात चप्पल नव्हती म्हणून पायाला खडं टोचत व्हतं. मी हाथ धुवून बारक्या घरात शिरलो , आईनं ताट वाढलं व्हतं . मी थेट ताटावर जाऊन बसलो , अन गपागपा खाऊ लागलो . आईनं आज काईच खायला न्हवतं आणलं बाजरातून ..म्या पण काईच ईचारलं नाय.."
         
           " तू बी , खाऊन घे कि . "
         
           " तू जेव , मी...ते आल्यावर जिवती.. तू जेव.."
           असं म्हणून आईनं अजून एक चपाती ताटात ठिवली . मी आपलं जेऊन..ओट्यावरच्या अंथरूनावर जाऊन पडलो..अन थोड्या वेळानं.. मला आपोआप डुलका लागला..अन मी झोपी गेलो..एक दीड तासानं मला जाग आली..शेजारी आई झोपली व्हती ..भाऊंच्या जाग्यावर त्यांची उशी अन सदरा काढून ठिवला व्हता..हे बघून मी उठून बसलो..अंथरून  सोडून थोड्याच अंतरावर भाऊ बसलं व्हतं.. मी आपला काही न बोलता तोंडावर पांघरून घेतलं अन भाऊंच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत बसलो ..


 रात्रीच्या टिपूर चांदण्यात , बाप ..
एकटाच त्या गोजिरवाण्या चंद्राकडं
बघत व्हता...
किलकिल्या डोळ्यांनी...!!
काय बघत व्हता , माहित नाय...
 जिन्दगीभर सोसलेल्या त्या कष्टामुळं,
 सुरकुत्या पडलेल्या डोळ्यात
त्याला आसवं लपवणं , कठीण जात असलं...!
कदाचित..!
उभ्या हयातीत , दुसऱ्यांची " सालं " धरून ,
त्याच्या देहाची काठी अन डोळ्यांची पार भोकरं झाली व्हती...आपल्याच जिवा-भावांच्या सुखासाठी...!!
आता , त्याला पहिल्यासारखी कामं व्हतं नव्हती ,
पण , पाठीचा कणा अन मनाची जिद्द कमी व्हईल ,
तर तो ...बाप कसला !! म्हणा....!
चंदू मामाच्या , त्या मायेच्या सावलीत..
एकटाच धाय मोकळून रडत व्हता...
सदरच्या बाहींन अन धोतराच्या खोळीनं,
तोंड दाबून ..पुन्यांदा, डोळं मात्र पुसित व्हता...!
कारण , बाबा आता थकला व्हता...!!

                                                           -क्रमश:
#अपरिचित_बाप.!!
#गावाकडच्या_गोष्टी
#आठवणी
#शेतकऱ्याचं_पोर 🚩
©Somnath R. Mohite




     

       
         

Campus स्टोरी ( Part 2)

"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!" "हो सांगतो पुढं हळूहळू...हे तर ऐक..!!...