Wednesday, 30 May 2018

Campus स्टोरी ( Part 2)



"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!"

"हो सांगतो पुढं हळूहळू...हे तर ऐक..!! आणि संत्या त्याची स्टोरी सांगू लागला...

" पोरांनो, जरा इकडे लक्ष द्या..!!" असं बोलून सरांनी सगळ्यांच लक्ष त्यांच्याकडं वळवून घेतलं. सर Procedure सांगायचे आणि पोरं सरांची जमेल तशी कॉपी करायचे. सरांनी सगळ्यांना आता तुम्ही काढा म्हणून सांगितले. तो किलकिल्या डोळ्यांनी सर काय सांगतायेत हे पाहत होता. एवढ्यात त्याला जाणवलं कि सर त्याच्याच कडे येतायेत, यानं पुन्हा मुंडी खाली घालून काहीतरी करतोय याचा बळंच दिखावा करू लागला.सर जवळ आले आणि त्याला बोलले...

"आज पहिलाच दिवस का कॉलेजचा ?? "
"हो" तो बोलला.
"Drawing Sheet , Drafter वगैरे आणलंय का.??"
"नाही"
"बरं ठीक आहे,तो पुढचा कसं काढतोय ते बघ  आणि उद्या मला हे सगळं साहित्य पाहिजे ."
"हो सर "

एवढी चौकशी करून सर निघून गेले.Drafter काय असतंय याला बापजन्मी माहित नव्हतंय. Drawing sheet माहित होतं, ते बी यानं शाळेत असताना Elementary आणि Intermediate च्या परीक्षा पास केल्या होत्या,ते बी "C" ग्रेड नी..!!

ज्यांच्या आई-वडिलांना त्यांचा मुलगा-मुलगी Engineer व्हावा अशी इच्छा असते,त्या पोरांना Admission घ्यायच्या अगोदर पासून माहित असतंय पुढे काय लागणार आणि काय नाही..इथं सगळं अनावधानानीच घडत होतं. याला करायचं होतं B.A. ...!
असो ,याबद्दल आपण नंतर बोलूच...!!
त्या प्लायवूड वर रेषा मारायला जोडलेलं यंत्र कदाचित Drafter असावा असा यानं अंदाज बांधला. आणि पुढचा काय काढतोय हे बघण्यासाठी पुढच्या बाकाशेजारी जाऊन उभा राहिला. सगळं अनोळखीच..!!
          सुरुवातीला जी पोरं उभा राहून दुसरी कसं काढतायेत हे पाहत होती कदाचित ते आजच आली असावीत असा यानं अंदाज बांधला.
              "बस कि भावा,इथं.. उभा का राहिलास..!! ज्याच्या शेजारी उभा होता तो मुलगा याला बोलत होता.
 "हा " म्हणून तो त्याच्या शेजारी बेंचवर बसला.           "पहिलाच दिवस वाटतं, कॉलेजचा ? "
"हा,आजच आलोय."
" नाव काय रं तुझा भावा..??              
 "संतोष"                  
 "तुझं?"
 "अक्षय "
              एवढं बोलून अक्षय drawing काढण्यात रमून गेला.थोड्या वेळ झाल्यानंतर त्याचं वर्गात मन लागंना,म्हणून त्यानं Drawing काढणाऱ्या मित्राला विचारलं,
                   
 "किती वाजता संपतो रे हा तास ?"
 "१०.३० "
 "बरं...!! "

तो परत येऊन मागच्या बेंचवर येऊन बसला.त्यानं खिशातून Nokia चा ३११० मोबाईल काढला आणि बेंचखाली धरून टाईम बघितला.त्यावेळी नुकतंच Android फोन वापरायला सुरुवात झाली होती.१०.१० झाले होते. अजून २० मिनिटं करावं काय म्हणून तो इकडं तिकडं बघत होता.कुणी दुसऱ्यानं काढलेल्या शीट्स मध्ये डोकावून बघत होतं तर कुणी शीट्स काढण्याच्या नादात गप्पा मारत होतं. पुढच्या बेंचवरची मुलं सरांना घेऊन काहीतरी विचारत होती आणि सर Drafter घेऊन त्यांना शिकवत होते. मधल्या बेंचवरची पोरं दुसऱ्या पोरांकडून शिकून घ्यायच्या भानगडीत होती. आणि मागच्या बेंचवरची पोरं मात्र नेहमीप्रमाणं टिंगलटवाळी करण्यात व्यस्त होती, त्यांना त्या शीट्स शी काही एक संबध नव्हता ,कामापुरतं येतंय ना बस झाला.त्यांच्या गप्पा चालल्या होत्या पण अभ्यासाच्या नाही,तर 'पोरींविषयी'..!!
तू तिला ओळखतो ? ती किती भारी दिसती राव? वैगेरे वैगेरे...!! काही पोरं बळंच जोक मारून बळंच हसत होती.
                 उजव्या साईडच्या बेंचवर बसलेल्या पोरी गप्पा मारण्यातच दंग होत्या.फर्स्ट बेंचवर बसलेली पोरगी नीटशी दिसत नव्हती पण ती मागं वळून बोलत होती.हा डाव्या साईडच्या लास्ट बेंचवर होता,त्यामुळं त्याची ,तिच्या टपोऱ्या डोळ्यांवर अन मानेवर रुळणाऱ्या केसांवरून ओझरती नजर फिरून गेली.नीटसा चेहरा काही दिसला नाही.
            पण,या सगळ्यात त्याला एक गोष्ट खटकली मधल्या रांगेत बसलेली २ पोरं यांच्याकडे बघून सारखी हसत होती. याला राहून राहून खजील झाल्यासारखं वाटत होतं. हसणाऱ्या पोरांकडं बघत यानं ठरवूनच टाकलं .पश्याला सांगून यांना चांगलाच फोडतो.
              इतक्यात पोरांची बॅगा भरण्याची लगबग सुरु झाली.१०.३० वाजत होते .सर आपली पुस्तकं ,खडू ,लांबडी पट्टी घेऊन निघून गेले.पोरांची बाहेर पडण्याची घाई जाणवत होती त्यानं आपली भली मोठी सॅक उचलली आणि बाहेर पडू लागला. दारातच पश्या उभा होता.....

-क्रमशः...

तळटीप: यातील सर्व पात्र काल्पनिक आहेत,वास्तवाशी काही संबध आल्यास निव्वळ योगायोग समजावा..!!😜

©सोमनाथ रा.मोहिते


Wednesday, 4 April 2018

Campus स्टोरी ( Part 1)



" मे आय कम इन सर...??" पश्या बोलत होता..
"येस कम इन...!!"

आणि सगळ्यांच्या अनोळखी नजरा त्या दारात उभ्या असलेल्या २ पोरांना कुतुहलाने न्याहाळत होत्या. खरंतर बोर झालेल्या लेक्चर मधून त्यांना या निमित्तानं थोडासा दिलासा मिळाला असेल खरा, असो..! दारात कोण उभं आहे आणि आता वर्गात अजून कोण नवीन आलंय हे बघण्यासाठी सगळे मानावाकडया करून दाराकडं बघत होते.


खरंतर कॉलेज सुरु होऊन २० दिवस झाले होते पण त्याच्यासाठी हा पहिलाच दिवस होता.काळ्याकुट्ट फळ्यावर सरांनी काहीतरी आडव्या उभ्या रेषा मारून काहीतरी आकृत्या म्हणा किंवा Drawings काढल्या होत्या.एका हातात लांबडी पट्टी आणि एका हातात खडू घेऊन सर उभे होते तर काही पोरांनी मोठा प्लायवुड चा चौकोनी तुकडा बेंचवर ठेऊन त्याला Drawings शीट्स आणि आडव्या उभ्या रेषा मारायला काहीतरी जोडलं होतं आणि काही जण दुसरं कसं काढतायेत हे पाहत होते,उभा राहून...!!


हे अजून दारात उभं राहून वर्गच न्याहाळत होतं, एवढ्यात पश्या बोलला,"जा बस जा,आतमधी..!!"
आणि एवढ्या वेळ पश्याच्या मागं उभारून चोरट्या नजरेने वर्ग न्याहाळत बसलेला एक सावळं पोरगं थोडं बाजूला सरून तेथेच पायाकडं बघत उभा राहिलं.सुरुवातीला पश्या दारात उभा असलेला सगळ्यांना दिसला पण हे जरा पश्याच्या मागं आपण दिसू नये या बेतानं उभं होतं.


पाठीवर नॉर्मल बॅग पेक्षा मोठी काळी बॅग ,साधारणतः गावाकडं वापरतात तशी ढगाळी काळी पॅन्ट आणि त्यालाच शोभेल असा पांढरा शर्ट जो कि खालून चौकोनात शिवला होता, पायात लॅन्सर चे बूट जे कि कॉलेज ला जाणारे म्हणून मित्राने २० दिवसापूर्वी घेऊन दिले होते आणि डोक्यावर चापून चोपून बसवलेले केस...!!


पश्या परत बोलला " जा बस जा आतमधी ,घाबरतोस कश्याला..??"
आणि पश्यानं त्याचा हात धरला आणि सरळ आतमधी शिरला , काय चाललंय हे सरांसकट सगळी पोरं कावरीबावरी होऊन बघत होती. पश्यानं शेवटच्या नेऊन त्याला बसवला आणि त्याच्या कानात काहीतरी बोलुन सरांना जातो म्हणून निघून गेला...!!


गावाकडच्या कॉलेज मध्ये जिगरी दोस्त असलेला लास्ट बेंच इथं त्याला पहिल्या दिवशी अनोळखी वाटत होता...!! शेवटच्या बाकावरचा आपलेपण त्याला जाणवत नव्हता जाणवणारही कसा हो,पश्या सोडला तर सगळे त्याला अनोळखी च होते आणि आपलेपणा निर्माण व्हायला आपली माणसं लागतात...!!


एवढ्यात कानावर शब्द पडले ,
शेजारच्या बेंचवर बसलेला एक गोरठेला मुलगा त्याच्या पुढच्या बेंचवर बसलेल्या पोराला विचारत होता....,
"भावा, ती फर्स्ट बेंचवर बसलेली कोण आहे रे...??"

एवढ्यात त्याच्या बोलण्याला मधेच तोडत गुड्डीने प्रश्न केला,"दादा ती वैनीच होती ना..??"

गावाकडं घराच्या वऱ्हांड्यात चांदुमामाच्या प्रकाशात आणि चांदण्यांना सोबत घेऊन तो कॉलेजच्या आठवणी रंगवत बसला होता..पोरांना घेऊन...!!

"नाही तसं काही नाही..." तो बोलला...
"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!"

-क्रमशः

©सोमनाथ रा. मोहिते

Friday, 23 March 2018

हैप्पी डेज.....❤

हैप्पी डेज...!!💞😍


परवा-परवाच फर्स्ट इयर ची Online लास्ट Insem पर्यंत पोहोचली आणि संपली देखील..! महिन्याभरापूर्वी गॅदरिंग ,NSS कॅम्प आणि शिवजयंती देखील फोटोरूपी आठवणीत कापरासारखी उडून गेली,आणि आज बंडखोरीने साजरे केलेले हैप्पी डेज सुद्धा भूतकाळात जमा झाले, असो....!!💞😜💞


First इयर ला पहिल्या दिवशी अनोळखी नजरेने आणि दबक्या पावलाने गाठलेला तो लास्ट बेंच..!!
त्यावेळेस सगळेच अनोळखी होते..अगदी बेंच सुद्धा....!! कँटीनमध्ये गर्दी होत असे म्हणून पळत जाऊन आपला आरक्षित टेबल पकडायचा आणि ४ जणांच्या डब्यामध्ये १० जणांचे हाथ जेवायचे, पण भूख मात्र भागायची..तेव्हा जे सळसळतं रक्त मैत्रीच्या नात्यामध्ये गुंफलं ते आजतागायत टिकून आहे...चिरंतर.....!!😘😍



लास्ट इयर ला कुणी कोकणात जातंय तर कुणी ट्रेकिंग ला..तर कुणी साखळी सारखा खेळ खेळतंय..!! कारण, जिंदगीच्या पुस्तकात आठवणींच टॉनिक कमी पडायला नको..काय म्हणता..!!😍😜
पोरं वयाने मोठी होतायेत पण मनानं लहान होऊन आठवणी मोरपिसासारख्या जपण्याचा प्रयत्न करतायेत...!!💞



आजच्या Traditional day ने हैप्पी डेज संपत आल्याची अजून एकदा जाणीव करून दिली.प्रत्येकजण आपल्या फर्स्ट इयर जुन्या तसेच ४ वर्षाच्या कारकिर्दीत जमवलेल्या मित्र-मैत्रिणींबरोबर आठवणींचा लास्ट सेल्फी घेण्याच्या भानगडीत होते...!! आणि कदाचित नटून-थटून आलेले चेहेरे फोटोच्या फ्रेममध्ये अजूनच सुंदरता आणत होते....!! 😎💞


आणि त्याची नजर फक्त "ती" लाच शोधत होती....निमित्त एक फर्स्ट अन लास्ट सेल्फी..!!😍😘

आता उरलय फक्त सबमिशन , लाज काढणाऱ्या ओरल्स आणि आठवणींचा Farewell... तोही अखेरचा....!!

स्टोरी अभी बाकी है मेरे दोस्त...!!💞😍
मिलते है ब्रेक के बाद...!!💓

-क्रमशः.....😍

#उत्सव_Engineering_चा...💐💐

Saturday, 2 December 2017

Engineering Life




"यावर्षी Engineers Day ला सादर केलेली कविता, जरा उशिरानच Post करतोय...!!"
मनातल्या भावना थोड्या शब्दातून...!!😊


Engineering च लाईफ असंच असतंय...!! 😊

चुकून आलो Engineering ला म्हणून सुरु केलेला
प्रवास अर्ध्यातून सोडून जायचं नसतंय,
Last Bench किस्से पुढच्या पिढीला हक्कानं सांगायचं असतंय ,
साला Engineering च Life असंच असतंय..!!💓


सबमिशनचा सण इथं उत्साहानं साजरा करतात,
HOD सरांच्या सहीसाठी पाय मोकार चकरा मारतात...!😁
किशोरदा, अरजित सिंग,मोहम्मद रफी,
या काळात जरा जास्तच आपलेसे वाटतात..!!
सबमिशनच्या काळात इथं कुणी-कोणाचचं नसतंय,
साला, Engineering च Life असंच असतंय..!! 😍


प्रेमाचं वारं ४ वर्षात एकदातरी येतंय,
Lecture ची जागा मग Canteen घेतंय..!
न परवडणारी Cofee मात्र आपलीशी वाटते,
मित्रांची Party मात्र वडापावच्या गाड्यावरच भागते...!😍
कळत-नकळत शेवटी प्रेमात दगा-फटका होतंय,
हे आपलं काम नाही म्हणून बेणं माघारी येतंय..!
Nice Dp म्हणून सुरु केलेल्या Love Story त Block च होऊन बसतंय,😂😍
साला, Engineering Life असंच असतंय..!!😉


चलन मिळवण्याची-भरण्याची तऱ्हा वेगळीच असते,
अनोळख्या गर्दीत Crush ला बघून मात्र दातखिळीच बसते...! 😘
परीक्षेच्या काळात सगळे, कट्टर मित्र होत्यात,
भावा, Passing पुरतं दाखव एवढ्यात काटेकोरमामा निघून जात्यात...!!😎
दीड तास शांत बसलेला गंगाधर शेवटी,
शक्तीमानच होतंय,😇
साला Engineering च Life असंच असतंय...!!😐


मित्रांच्या दुनियादारीत हे college आपलंच असतंय,
पोरगं Lecture ला कमी अन कट्टयावरच जास्त दिसतंय..!! 😎😍
मोरपिसासारख्या जपलेल्या आठवणी,
कॉलेज संपल्यावरच कळतात...
आठवणींचा Album मात्र सर्वजन आवर्जून चाळतात...!!😍😘
१००% Engineer नाही झाला तरी,९०% माणूस व्हायचं असतंय,
साला, Engineering च Life एवढं सुंदर असतंय..!! 😍


शेवटी कसंय ना दोस्ता,
सळसळत्या रक्तात जगाला बदलण्याची ताकद लपलीये...
साला, इथं तर आख्खी Story च आपलीयं...!!😍😘


© सोमनाथ रा. मोहिते
#Campus_Stories...😊
#१५ सप्टेंबर


Tuesday, 9 May 2017

राजगड



"राजगड" म्हणजे आयुष्य..!!

इतक्यात अचानक संतुदाची लायब्ररी वर धाड पडली . अन ठरला बेत.."राजगड" सर करण्याचा, चंद्र अन चांदण्यांच्या सोबतीनं..!!
ती मंथरलेली रात्र कदाचित यासाठीच फितूर झाली असावी..!! अन झाला अट्टाहास "सूर्यादय" पाहण्याचा..!!

खरंतर चांदुमामाच्या सोबतीनं गड जगायला चाललो होतो अन नकळत या रांगड्या सह्याद्रीच्या मनापासून स्वाधीन झालो होतो..!! गेल्या कित्येक मोहिमा चांदुमामाच्या मायेच्या सावलीत पार पाडल्या होत्या , आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी मात्र काळजात साठवून ठेवल्या होत्या..!!

रातकिड्यांचा किर्रर्र आवाज , रात्रीची ती हवीहवीशी निरव शांतता चिरून टाकत होता.कधीकधी या डोंगरदर्यातला हा काळोख खायला उठतो..!!
आयुष्यात पहिल्यांदा आकाशगंगा (Milky Way)पाहिली असेल कदाचित...!!
इतिहास जगत पाय चोरवाटेने पद्मावती माची जवळ करत होते..!! पद्मावती देवीचं दर्शन घेऊन सुरु झाली खलबतं.! तेज्या अन संतुदा नं इतिहास नव्यानं जगायला अन पाहायला शिकवलं..!!

त्या चांदुमामाच्या निरभ्र छायेखाली "राजगड" इतिहास जगायला शिकवत होता..!!
शुक्राची चांदणी हळूहळू वरती येताना दिसू लागली अन थकलेले पाय आपसूक बालेकिल्ल्याकडे धाव घेताना जाणवू लागले..!!
" सुर्यादय " बघायला नाही तर "जगण्यासाठी" हा अट्टाहास..!!

पूर्वेकडे हळूहळू तांबूस रंगाची लय उमटायला लागली होती. सुवेळा माचीचा बेलागपणा दृष्टीस पडत होता.पक्ष्यांची किलबिल कानी पडत होती.बहिणाबाईंच्या कवितेनुसार , त्या डोंगर दर्यात सूर्यनारायण नव्याने जन्म घेत होते.जसे पेरणीनंतर पेरलेल्या बियांना ओलावा भेटला कि अंकुर जमिनीची छाती चिरून बाहेर येतो , या उघड्या आकाशाला जगायला..!! तसेच सूर्यनारायण हळूहळू आपले अस्तित्व जगाला सांगायला तयार होत होते. हा-हा म्हणता तो तांबूस रंगाचा गोळा हे अवघं आसमंत काबीज करण्याच्या तयारीत होता अन आम्ही जमेल तेवढा हा न संपू वाटणारा क्षण-सुर्यादय डोळ्याच्या खोबणीत साठवून ठेवण्याच्या निष्फळ प्रयत्नात होतो..!!
रात्रभर चाललेला क्षीण आपसूक कापरासारखा उडून गेला..!!
त्या सूर्याचा उदय आम्हाला आमच्या जीवनात नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद मात्र जागवून , हे उभं विश्व गिळंकृत करण्याच्या तयारीला लागला..!!

काहीतरी गवसल्याच सुख चेहऱ्यावर घेऊन स्मित हास्य करत , पाय नव्या जोमानं गड उतरायला घाई करत होते..!!

©सोमनाथ रा. मोहिते

Monday, 20 February 2017

" बाप "

                               
                     
         सूर्य मावळतीकडं झुकला व्हता . हळूहळू कडुसं पडायला लागलं व्हतं..! त्याचा तांबडाशार रंग अवघ्या सृष्टीला गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात व्हता . अगणित सौंदर्याने नटलेला सूर्यास्त आणि त्यामुळं नानाविध रंगाच्या छटा सर्वदूर पसरल्या जात व्हत्या . हळूहळू सूर्यनारायण अस्ताला चालला व्हता .. नव्या प्रारंभाची पहाट घेऊन येण्यासाठी.!!
माझ्या छोट्याश्या डोळ्यांत त्या रंगाच्या छटांचे प्रतिबिंब पडले होते . तो अस्ताला जाणारा भास्कर दरवेळेस नव्या उमेदीने जीवन जगण्याचा मूलमंत्र देऊन जात व्हता , एवढं मात्र खरं..!!

         त्यादिवशी सोमवार व्हता .. बाजाराचा वार. आज दुपारून शाळेला सुट्टी असते. त्यादिवशी चा बाजार हळूहळू वसरायला लागला व्हता . मी आपला शाळेची कापडं..खाकी पॅन्ट अन पांढरा सदरा घालून हापश्यावर बसून भाऊंची वाट बघत बसलो होतो . आम्ही आमच्या वडिलांना " भाऊ " म्हणून संबोधतो.. रस्त्यावरून हळूहळू बैलगाड्यांची , वाहनांची , शेळ्या , मेंढ्या यांची गर्दी हळूहळू वाढायला लागली व्हती. सोमवार चा आठवडी बाजार उरकून व्यापारी आपापल्या गावाच्या वाटेला लागले होते .
     
          बाया , डोईवर माळव्यांच्या पिशव्या घेऊन चालल्या व्हत्या . अन त्यांच्या हाताला धरून चालणारी त्यांची बापडी.. त्यांची पोरं..घोडीशेवेचा तुकडा नाचवत-नाचवत आनंदाने उडया मारीत चालली व्हती . मी आपला हे सगळं किलकिल्या डोळ्यांनी भाऊंची वाट बघत बसलो व्हतो..तेवढ्यात एका पोराचा रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला . ते आपल्या आईला रडून-रडून सांगत व्हतं...
       
         "आए , मला आज बी नवा शरट घेऊन का नाय आली , गेलं चार दिस ते मास्तर मला कोंबडा बनायला सांगत्यात ..!! "
       
         एवढं बोलून त्या पोराचा भोंगा आजून वाढला .रस्त्यावरुन चाललेल्या आया-बाया त्या पोराच्या तोंडाकडं बघायला लागल्या..नाकातला शेंबुड सगळा खाली येतंय हे बघून त्या पोरानं आपल्या हाताच्या पालथ्या मुठीनं शेंबूड पुसला..!
शेजारच्या बाया बघायला लागल्यात हे बघून त्याच्या आईनं त्याला दरडावून सांगितलं ...

         " सांगत्ये , तुझ्या बापाला आणायला  उद्या..तालुक्यावून..! त्यांना तर जरा बी काळजी नाय पोराची.."
       
         हे ऐकून शेजारच्या बाईनं सहमतीदर्शक मान डोलावली हे बघून त्याच्या आई बोलली..
       
         " नाहीतर काय..!! "
       
हे ऐकून , पोरगं पाय आपटीत आईच्या पुढं निघून गेलं.

        त्यांचं संभाषण ऐकून नकळत माझ्या चेहऱ्यावर हास्याची कणाद उमटली , पण दुसऱ्याच क्षणाला माझी नजर माझ्या शरटावर पडली..आज सकाळीच माझ्या बी शरटाची बटणं पडली व्हती . सकाळीच आईनं दोन वेगवेगळ्या रंगाची बटणं माझ्या सदऱ्याला बसविली व्हती..! साळात माझा निम्मा टाईम तर बटणं लपविण्यात गेला व्हता..!
इतक्यात , रस्त्यावरून आमच्या तात्यांचा आवाज कानावर पडला .. माझ्या विचारमंथनातून माझं लक्ष विचलित झालं ..अन मी तात्याला ईचारलं.,

       " तात्या , भाऊ दिसलं का व बाजारात..? "
     
       " नाय रं , महिड्या ..मघाशी दिसला व्हता बाजारात , परत नाय बाबा नजरं पडला..बसला असलं नजीरमामापाशी.."
     
       " बरं.."
     
       एवढं बोलून तात्या निघून गेलं . हळूहळू अंधार पडायला लागला व्हता . रस्त्यावरची रेलचेल हळूहळू कमी व्हायला लागी व्हती . बैलगाड्यांच्या  बैलांच्या गळातील चंघाळया ( घुंगरं ) एक विलक्षण नाद निर्माण करून त्या रम्य संध्याकाळची शोभा अजूनच वाढवीत व्हती . मघाच्याधरणं पोरांनी शंभर येळा मला " चिरघुडी " खेळायला बोलावलं व्हतं.. पण मी नाय गेलो ..मी आपलं भाऊंची वाट बघत बसलो व्हतो..!!
     
       आई आज लवकरच भाकरी-कालवनाला लागली व्हती . तिचा स्वयंपाक कदाचित झाला असावा .देवापुढं दिवा लाऊन , तिनं ओट्यावर अंथरून टाकून भाऊंची वाट बघत बसली व्हती..तिनं ओट्यावरूनच मला हाक मारली ,
     
        " ये महिड्या , अजून आलं कि नाय ती ..कवाच्याधरणं वाट बघत बसलाय.."
     
        " आए , भाऊ काय दिसना झाल्यात..म्या तात्याला पण ईचारलं पण ना ती पण नाय दिसलं म्हणलं..! तुला काय सांगून गेलतं का ? "
     
        " तू हु म्होरं ..मी आलू पाठीमागनं ..म्हणलं.! काय माहित कुठं बसलाय हा माणूस..तू ये जेऊन घे..सकाळधारनं काय खाल्लं नसल "
     
        " थांब , थोड्या येळ वाट बघतो अन येतो.."

एवढं बोलून , आई ओट्यावरून घरामधी गेली . कंदील अन चिमणी घेऊन आली..रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात चिमणीत त्याल भरत बसली.मी आपला शरटाची कॉलर तोंडात चघळत परत भाऊंची वाट बघत बसलो.तेवढ्यात त्या अंधारातून एक धोतार अन सदरा घातलेली सावली माझ्या दिशेनं हळूहळू जवळ येतंय हे मला जाणवलं ..मला वाटलं भाऊ आलं.. मी आपलं डोळं ताणून भाऊंची वाट बघत व्हतो. जशी-जशी सावली जवळ आली तशी मला जाणवलं ते भाऊ नसून आमचं आबा व्हतं. माझा हिरमूड झाला.हळूहळू अंधार वाढायला लागला व्हता , तरी अजून भाऊंचा पत्ता नव्हता . तेवढ्यात कुणीतरी खांदयावर घागर घेईन माझ्याच दिशेनं येताना दिसलं.. मी हापश्यावर बसलो व्हतो ना..! जवळ आल्यावर कळलं बाळूमामांचा मोन्या खांद्यावर घागर पाणी भरायला आला व्हता .जरा आतंरावरून त्यानं मला हाक मारली ,

          " काय गब्या , हपश्याला राखण भसलास व्हय ..?? "
       
          अन हसायला लागला.मला राग आला.
       
 " नाय रं , लंबुळया तुझीच वाट बघत बसलो व्हतो.."

          एवढ्यात ते हापश्यावर पोचलं व्हतं . मी आपला खाली उतरलो.
       
          " नाय रं , हापश्यावर बसलाय म्हणलं पाणी भरून देतोय का नाय..म्हणून म्हणलं .."
       
         अन परत जीभ काढून हसायला लागलं..!
       
         " माझ्या काय बापाचा हापसा हाय व्हय , च्यायला काय बी बोलतंय..! "
       
         मग थोड्यावेळ झाल्यावर मीच त्याला ईचारलं ,
       
         " मोन्या , आज गेलता का जनावरांच्या बाजारात... बापुसंग..? "
       
         " व्हय , गेलतू कि...का रं ."
       
         " आमचं भाऊ , दिसलं का जनावरांच्या बाजारात मंग.." परत त्यानं चेष्टनं बोलला,
       
         " तुझं म्हातारं व्हय , दिसलं व्हतं कि..बैलं घेऊन उभा राहिलं व्हतं बाजारात..पाटलाचा व्यापारी पण व्हता संग...आज तुमची बैलं ईकायला नेलती व्हय..! "
       
          " व्हय , सकाळीच नेलती...आता सकाळची रात झालीय..तरी भाऊ अजून आलं नाय राव..आमचं.."
       
          एवढं बोलून  मी , आपल्या पायाच्या बोटांकडं बघत उभा राहिलो..मोन्यानं मघाच्याधरणं हापसा आपटीत एक घागर भरली व्हती..आणि त्यांनी दुसरी घागर भरायला लावली,अन बोलायला लागला...,
       
          " म्हणून इथं थांबलास व्हय..दुपारी मी थांबलो व्हतो..थोड्या येळ भाऊ पशी.. एका व्यापाऱ्यानं लय पाडून मागितली राव तुमची बैल..अन त्यांचा चेहरा पडला.."
       
          " मंग.."
       
          " मंग काय , ते येड्याभोकाचं व्यापारी लय पाडून मागत व्हतं.. म्हणून सौदा नाय जमला.. ते दीड शहाणं म्हणून गेलं.. तुमच्या बैलाला काय सोनं लागलंय व्हय.इका कुणाला इकायचा ती..अन निगुण गेलं..!" मोन्या बोलत व्हता ,
       
          " त्याला काय माहित बैलं म्हंजी शेतकऱ्यांच्या जीवाला सोन्यापेक्षा सुध्या लय खास असत्याती.. घरात जर बैल अन गाया नसतील तर त्या घराला घरपण येत नाय..! तुला माहितीय महिड्या , बैल म्हणजे मातीतलं कोहिनूर असत्याती..!"
       
           एवढं बोलून मोन्या थांबला , मोन्या बोल्तानी भावूक झाला व्हता..मी त्येच्या चेहऱ्याकडं बघतच बसलो..त्याला जनावरांविषयी जरा जास्तच माहिती व्हती . त्याचं बापू बाजारात शेळ्यांचा व्यापार करत व्हतं . त्यामुळं त्याला थोडं फार त्यातलं गिन्यान व्हतं..!
         
           " मंग पुढं..? "
         
           " मी तिथून निघून गेलो , अन परत थोड्या येळाने घरी आलू.. " त्याची घागर भरून पाणी सांडायला लागलाय हे त्याच्या ध्यानात आलं , त्यानं घागर बाजूला काढली अन बोलला
         
           " नगं , काळजी करू..येत्यानं तुमचं भाऊ..या व्ययात कुठं जाणारंय म्हातारं..! "
         
           एवढं बोलून त्यानं एक घागर खांदयावर अन एक हातात घेऊन निघून गेला जाताना बी पाणचट विनोद करून गेलं , मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं थोड्यावेळ बघत बसलो ..हळूहळू ते रात्रीच्या अंधारात गडुप झालं..! एवढ्यात घरून परत आई चा आवाज आला ,
         
           " आलं का नाय ती  , नसलं दिसत तर ये , भाकर खाऊन घे..येत्यान ती "
         
           " बरं , आलो..ताट वाढ."
         
           आई परत बारक्या घरात गेली . मी थोड्या येळ भाऊंची वाट बघितली , अन जड पावलाने घराकडं चाललो. पायात चप्पल नव्हती म्हणून पायाला खडं टोचत व्हतं. मी हाथ धुवून बारक्या घरात शिरलो , आईनं ताट वाढलं व्हतं . मी थेट ताटावर जाऊन बसलो , अन गपागपा खाऊ लागलो . आईनं आज काईच खायला न्हवतं आणलं बाजरातून ..म्या पण काईच ईचारलं नाय.."
         
           " तू बी , खाऊन घे कि . "
         
           " तू जेव , मी...ते आल्यावर जिवती.. तू जेव.."
           असं म्हणून आईनं अजून एक चपाती ताटात ठिवली . मी आपलं जेऊन..ओट्यावरच्या अंथरूनावर जाऊन पडलो..अन थोड्या वेळानं.. मला आपोआप डुलका लागला..अन मी झोपी गेलो..एक दीड तासानं मला जाग आली..शेजारी आई झोपली व्हती ..भाऊंच्या जाग्यावर त्यांची उशी अन सदरा काढून ठिवला व्हता..हे बघून मी उठून बसलो..अंथरून  सोडून थोड्याच अंतरावर भाऊ बसलं व्हतं.. मी आपला काही न बोलता तोंडावर पांघरून घेतलं अन भाऊंच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत बसलो ..


 रात्रीच्या टिपूर चांदण्यात , बाप ..
एकटाच त्या गोजिरवाण्या चंद्राकडं
बघत व्हता...
किलकिल्या डोळ्यांनी...!!
काय बघत व्हता , माहित नाय...
 जिन्दगीभर सोसलेल्या त्या कष्टामुळं,
 सुरकुत्या पडलेल्या डोळ्यात
त्याला आसवं लपवणं , कठीण जात असलं...!
कदाचित..!
उभ्या हयातीत , दुसऱ्यांची " सालं " धरून ,
त्याच्या देहाची काठी अन डोळ्यांची पार भोकरं झाली व्हती...आपल्याच जिवा-भावांच्या सुखासाठी...!!
आता , त्याला पहिल्यासारखी कामं व्हतं नव्हती ,
पण , पाठीचा कणा अन मनाची जिद्द कमी व्हईल ,
तर तो ...बाप कसला !! म्हणा....!
चंदू मामाच्या , त्या मायेच्या सावलीत..
एकटाच धाय मोकळून रडत व्हता...
सदरच्या बाहींन अन धोतराच्या खोळीनं,
तोंड दाबून ..पुन्यांदा, डोळं मात्र पुसित व्हता...!
कारण , बाबा आता थकला व्हता...!!

                                                           -क्रमश:
#अपरिचित_बाप.!!
#गावाकडच्या_गोष्टी
#आठवणी
#शेतकऱ्याचं_पोर 🚩
©Somnath R. Mohite




     

       
         

Monday, 15 August 2016

" बालविश्व "

" ऐ , दया.... पंधराह कटिंग देना "

" हा , अभी देता हुँ..."

नुकताच १०.३० चा ब्रेक झाला होता.आणि हळू-हळू सगळी पोरं चहाच्या टपरीवर जमायला लागली होती...अन्यानें पहिल्यांदाच चहाची ऑर्डर देऊन ठेवली होती...श्रेया , आश्या, रम्या, सौऱ्या आणि त्यापाठोपाठ हळू-हळू एक वीसेक पोरं टपरीवर जमा झाली आणि सगळ्यांनी आपापला चहाचा कप पटापट उचलून , चहावर ताव मारता-मारता थट्टा मस्करी चालू होती.

" ये, ऐका ना...." अन्या बोलत होता.

वीसेक पोरांच्या घोळक्यात अन्या दिसत नव्हता, पण आवाज सगळ्यांच्या परिचयाचा होता.

" ये , ऐका ना...मी काय म्हणतो...?"

"बोल ....बारक्या.." वाक्याला मध्येच तोडून श्रेया बोलला, आणि एकच हशा पिकला...हळू-हळू सगळे शांत झाले..अन् अन्या बोलायला लागला.

" यावर्षीचा स्वातंत्रोत्सव आपण सगळ्यांनी एका वेगळा पद्धतीने साजरा करायचा का ?"

"पण, करायचं काय नेमकं ?" पंक्या चहाचा भुरका मारत विचारत होता.

" माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण यावर्षीचा स्वातंत्रोत्सव एखाद्या अनाथाश्रमात साजरा करायचा का?"

"हा , तेवढाच राहिलाय आता.." मध्येच कुठूनतरी परत श्रेयाचा आवाज येत होता.परत सगळी मन-मुराद हसली.

"ये, श्रेया गप ना..बाबा..मी सिरीयस आहे."असे म्हणत अन्यानें श्रेयाला एक शिवी हासडली..परत पोरं ,खळखळून हसली...

" हा,तू बोल अन्या... श्रेया गप ना.."सौऱ्या बोलत होता.

"माझ्या नजरेत एक अनाथाश्रम (मती-मंद मुलांची शाळा) आहे.तिथं जाऊन यावेळेस आपण त्यांना मदत करू.."

सर्वांनी अन्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

"मग, आताच जाऊन तिकडे चौकशी केली तर.."श्रेया गंभीरतेने बोलत होता.

"हो...चालेल की.."

"मग, तेवढं बिल दे..लगेच निघू.." आश्या बोलून गेला.

अन्याने परत शिवी हासडली अन बिल दिलं.. सगळी परत मन-मुराद हसली.
किका बसल्या...गाड्या निघाल्या...कॉलेज बंक करून..

" खरतरं, ज्या समाजात आपण राहतो..त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो..हीच बांधिलकी जपत पोरांनी अनोख्या पद्धतीनं स्वातंत्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता..युवा पिढीला दोष देणाऱ्या मुस्काटात , चपराक बसली होती.."

" पत्ता विचारात-विचारात आम्ही योग्य त्या पत्त्यावर पाहोचलो..गाड्या बाहेर लावल्या ..ऐक 2 गुंठ्याचा प्लॉट असेल..त्यांची कठड्याची भिंत म्हणून सगळीकडे पत्रे बसवलेले होते..आणि गेटही पत्रयाचेच होते..हळू-हळू आम्ही आतमध्ये गेलो..खोरे आमच्या सोबतच होता..खोरे म्हणजे आमचा अधिकृत " वक्ता "..! आम्ही आधीच कल्पना देऊन ठेवली होती..त्यामुळे त्यांचा एक माणूस आम्हाला घ्यायला होता ...आम्ही ऑफिस मध्ये प्रवेश केला..आणि स्थानापन्न झालो..खोरेनी तेथील मुख्याध्यापिकेला शाळेविषयी माहिती विचारात होता..मी ऑफिस न्याहाळत होतो..ऑफिस मध्ये भिंतीवर छत्रपती  शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,महात्मा गांधी आणि बऱ्याच महापुरुष्यांच्या प्रतिमा होत्या..भिंतीवर मध्यभागी , अगदी दर्शनीय ठिकाणी..एक मोठी प्रतिमा लावली होती..माझ्यासाठी एक अनोळखी व्यक्ती...नाव होतं..."हेलन केलर"( Hellen Keller).. अन डोक्यात विचारांचं काहूर माजलं... कोण असेल ही व्यक्ती?एवढी मोठी प्रतिमा का लावली असेल?काय काम केलं असेल नेमकं हीने ? 
अश्या असंख्य विचारांनी मनात गोंधळ घातला होता.म्हणून मी बाहेर उठून गेलो..परत पाणी आणि चहा आला...चहा पीत-पीत मी शाळा फिरत होतो...किरण्या आणि श्रेया बाहेरच बसली होती.

शाळेत एक किचन , टी. व्ही. रूम होती,लॉकर चे दरवाजे तुटले होते..एका पत्र्याच्या शेड मध्ये या मुलांच्या डंबल्सची प्रॅक्टिस चालू होती...१५ ऑगस्ट ची तयारी...काही मुलांना जमत नव्हते..त्यांचं हात पाय म्हणेल असं हलत नव्हतं... पण हि मूले जिद्दीनं ती प्रॅक्टिस करत होती...मला चहा संपल्याची जाणीव झाली अन मी परत फिरलो..मनात एकच प्रश्न , हि " हेलन केलर " कोण ?? तेवढयाच हि पोरं सगळी तयारी...बोलणी...आणि कार्यक्रमाची आखणी करून बाहेर आली होती...

"तुझं माझं बाजूला सारून, पोरं त्या मती-मंद मुलांचा आधार व्हायला तयार झाली व्हती..
ज्यांना त्यांच्या आई-वडिलांनी झिडकारले व्हतं, 
त्यानां हि पोरं, आपलंसं करायला चालली व्हती..
कार्यक्रम ठरला..वेळ ठरली..अन १५ ऑगस्ट च्या अनोख्या स्वातंत्रोत्सवचा बिगुल वाजला होता.."

अन्, माझं मन...अजून एकाच गोष्टीत अडकून पडलं...व्हतं...ही.. " हेलन केलर " कोण ??

                                                    - क्रमाश:

                      " हेलन केलर "

" अंतःकरणात जेव्हा उंच भरारी मारण्याची महत्त्वकांक्षा असते ना, तेव्हा भुईवर सरपटणे कुणालाच मानवत नाही." हे आहेत, हेलन केलर यांचे बोल..आपली पदवी ( कला ) घेताना त्यांच्या भाषणात त्यांनी उच्चारलेले शब्द...अत्यंत प्रभावी...मनावर आघात करणारे...तुम्ही विचाराल, या नेमक्या आहेत तरी कोण ?

" हेलन केलर या एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती आणि अध्यापिका.. त्यांचा जन्म २७ जून १८८० चा...यांचं आत्मचरित्र वाचताना आपल्याला याची जाणीव होती कि..आपण छोट्या छोट्या अडचणींना आणि थोड्या बिकट परिस्थितीला किती घाबरून जातो आणि खचून जातो..आणि परिस्थिती पासून दूर पळण्याच्या नुसत्या वाटा शोधतो...

"हेलन केलर, या एक अतिशय बुद्धिमान मुलगी, हे जग जाणून घेण्यासाठी उत्सुक..अतिशय मनमिळाऊ आणि अतिशय खुशहाल जीवन जगात असतानाच त्यांच्या या हसत्या खेळत्या जीवनाला ग्रहण लागलं..वयाच्या १९ व्या वर्षी , ताप आला म्हणून निमित्त झालं अन या तापीने त्यांना दृष्टिहीन आणि मूक बधिर , ही कायमची व्याधी देऊन गेलं..
एखादा माणूस रात्री झोपावा आणि सकाळी उठून बघतो तर काय, त्यांच्या समोर..यावा काळोख नुसता " काळोख "...त्यांच्या बाबतीत हि असच काही घडलं...परमेश्वराने अगाध लीला खेळली अन त्याना, ही जीवन देऊन गेला..."

" सर्वसामान्य मुलगी काय करेल...खचेल... कोलमडून पडेल..तिचं उभं आयुष्य काळोखाच्या गर्तेत जाईल...पण हि मुलगी तशी नव्हती, " तीचे बाहेरचे डोळे जरी बंद झाले असले तरी, अंतःकरणातील डोळे मात्र जागृत झाले होते.."
ही मुलगी परत जिद्दीने , आयुष्यात पेटून उठली..अन इतिहासात अमर झाली..तिनं आपलं उभं आयुष्य अपंगाच्या सेवेत घालवलं.. सगळ्या जगाला या स्त्रीचा हेवा वाटत होता...ऐका भेटीच्या दरम्यान " रवींद्र नाथ टागोर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना या स्त्रीच्या कार्याने प्रभावित केलं होतं.." संजय लीला भन्साळी यांचा " Black " हा सिनेमा याच धर्तीवर बनवलेला आहे..

" त्या ,भल्या मोठ्या प्रतिमेचं महत्त्व मला आता कळत होतं.. मी  त्यांच्याविषयीच मिळेल ती माहिती अधाश्यासारखी वाचत होतो. ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाची तयारी झाली..कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडला.त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता...तिथं आपल्यासारख्या लाभ-लोभाचा लवलेश ही जाणवत नव्हता ...फक्त अन फक्त निर्मळ हसू अन पवित्र मन...नाहीतर आपण...असो..म्हणूनच म्हणतात ना..." मुले म्हणजे देवघरची फुले.."
त्यात तिळमात्रही शंका नाही...एक मात्र समजले कि, 
" लहानांना त्यांच्या पातळीवर जाऊन शिकवायचं म्हणलं तर थोरांनाही पोरं व्हावं लागतं...."

विनोबा भावे म्हणतात, " जगता शिकता यावं अन शिकता शिकता जगता यावं "  या उक्ती नुसार जगाच्या बाजारात आज नव्यानं जगायला सुरुवात झाली..घड्याळ्याच्या काट्यांची गती मंद झाली 
जेव्हा निरोपाची वेळ आली ..तेव्हा त्या मुलांनी विचारणा केली - "आम्हा कडे कोणीचं येत नाही ,
 मित्रांनो तुम्ही पुन्हा कधी रे येणार..." 
 " त्या मुलांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या..अन अपेक्षा वाढल्या कि,त्या पुऱ्या करण्याची वृत्ती पण आपोआप च वाढते.."

 म्हणतात ना.." विचारांच्या पातळीवर एकत्र येणारी माणसं ही.. Standard Of Living चा विचार करतात..आपलं अन दुसऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करतात.." आता ही माणसं ,या तत्वावर एकत्र आलेली आहेत...आणि आता तर ही सुरुवात आहे...या कागदी पदव्यांच्या जगात , समाजसेवेसाठी उचललेला खारीचा वाटा.."

 बाकी आमचा खोरे म्हणतो...
"करता करवीता तर तो परमेश्वर , आपण सारे फक्त निमित्त "

#Maitri_ Foundation
#१५_ऑगस्ट_२०१६
© Somnath R. Mohite

Saturday, 6 August 2016

" लाल - परी "




" डोंगरातून जाणारी वळणा- वळणाची वाट, त्या रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार वनराई..
आणि अश्या एखाद्या वळणावर , त्या हिरवाईत दिसणारा " लाल-डब्बा"...🚌🚃

" लाल - डब्बा " या नावाने प्रसिद्ध असणारी आपली सर्वांची लाडकी S.T. ..🚌

" फाट्यावर सगळ्यांना वाट बघायला लावणारी ,
उशिरा निघून, वेळेला पोहचवनारी..." 😜

"प्रवाशांच्या सेवेसाठी" हे ब्रीद वाक्य घेऊन धावणारी आपली S.T...दैनंदिन जीवनात खरच प्रवाश्यांच्या विश्वासाला सार्थ ठरतेय...

" रस्ता कसाही असो हो...पण आपला मिजास आणि थाट तेवढ्याच डौलात घेऊन धावणारी..
"जिथे रस्ता, तिथे S.T " या वाक्याप्रमाणेच छोटी छोटी गावं जोडणारी वाहिनी...."

" गावाकडच्या कॉलेज जीवनात महत्वाची भूमिका बजावणारी.. काहींची मनं येथेच जुळली..आणि काहींचा " फॅन्ड्री " पण येथेच झाला..."😜😝

" कमी पैशात, गावाकडील ज्येष्ठ व्यक्तींना (बहुतांशी म्हातारी माणसं ) आपल्या मुलींना - नातवंडांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळवून देणारं ग्रामीण भागातील " विमानच " म्हणा ना..." ✈🚁

"फिरस्ती" लोकांना आवडेल तिथं प्रवास हि सुविधा उपलब्ध करून देणारी..." 👬👬

" एकेकाळी टपावर मोठ-मोठ्या बॅगा मिरवत धावणारी एसटी आता अभावानेच दिसते. तशी कारनं पण बरेच आहेत म्हणा....सध्या एसटी अस्वच्छतेच्या विळख्यात बुडालेली आहे अस म्हणण्यात वावगं ठरणार नाही म्हणा...असो..."

स्वातंत्र्योत्तर काळात, तत्कालीन मुंबई प्रांतात ‘बॉम्बे स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट कॉपरेरेशन’ (बीएसआरटीसी) ही सार्वजनिक कंपनी सुरू झाली होती. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४९ या दिवशी मुंबई ते अहमदाबाद (तेव्हा मुंबई प्रांतातच) या मार्गावर धावली होती. त्यामुळे, हा दिवस एस.टी.चा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. ( संदर्भ- लोकसत्ता)

अश्या या आपल्या लाडक्या एसटी चा काल ६८ वा वर्धापन दिन होता...कालच गावाकडं जाण्याचा योग आला म्हणून ते पण माहित झालं...कितीही महागड्या गाड्यातून प्रवास केला तरी आपल्या लाडक्या एसटी ची त्याला सर यायची नाय म्हणा.. "स्वत्याच्या विश्वात Music Composer असणार्या आपल्या लाडक्या एसटी चा ‪#‎Birthday‬...

काल एक सुंदर चारोळी वाचण्यात आली...

" एकदा व्होल्वो बस म्हणाली, तोऱ्यात लाल एस. टी. ला बाजूला हो भिकार्डे दिसत नाही का तुला...
लाल एस.टी. डोळे मिचकावत म्हणाली..
एकदा ये तर खरी मुक्काम पोस्ट चिखल वाडीला..
मग बघू पेलवते का तुझ्या फॉरेन बॉडीला..."

‪#‎लाल_डब्बा‬
‪#‎प्रवाशांच्या_सेवेसाठी_सैदव_तत्पर‬
‪#‎प्रवाश्यांच्या_सेवेसाठी‬
‪#‎६८_वा_वर्धापन_दिन‬ 🎂🎊💐
‪#‎latepost‬
‪#‎१_जून‬
© Somnath R. Mohite

Campus स्टोरी ( Part 2)

"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!" "हो सांगतो पुढं हळूहळू...हे तर ऐक..!!...