Tuesday, 9 May 2017

राजगड



"राजगड" म्हणजे आयुष्य..!!

इतक्यात अचानक संतुदाची लायब्ररी वर धाड पडली . अन ठरला बेत.."राजगड" सर करण्याचा, चंद्र अन चांदण्यांच्या सोबतीनं..!!
ती मंथरलेली रात्र कदाचित यासाठीच फितूर झाली असावी..!! अन झाला अट्टाहास "सूर्यादय" पाहण्याचा..!!

खरंतर चांदुमामाच्या सोबतीनं गड जगायला चाललो होतो अन नकळत या रांगड्या सह्याद्रीच्या मनापासून स्वाधीन झालो होतो..!! गेल्या कित्येक मोहिमा चांदुमामाच्या मायेच्या सावलीत पार पाडल्या होत्या , आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी मात्र काळजात साठवून ठेवल्या होत्या..!!

रातकिड्यांचा किर्रर्र आवाज , रात्रीची ती हवीहवीशी निरव शांतता चिरून टाकत होता.कधीकधी या डोंगरदर्यातला हा काळोख खायला उठतो..!!
आयुष्यात पहिल्यांदा आकाशगंगा (Milky Way)पाहिली असेल कदाचित...!!
इतिहास जगत पाय चोरवाटेने पद्मावती माची जवळ करत होते..!! पद्मावती देवीचं दर्शन घेऊन सुरु झाली खलबतं.! तेज्या अन संतुदा नं इतिहास नव्यानं जगायला अन पाहायला शिकवलं..!!

त्या चांदुमामाच्या निरभ्र छायेखाली "राजगड" इतिहास जगायला शिकवत होता..!!
शुक्राची चांदणी हळूहळू वरती येताना दिसू लागली अन थकलेले पाय आपसूक बालेकिल्ल्याकडे धाव घेताना जाणवू लागले..!!
" सुर्यादय " बघायला नाही तर "जगण्यासाठी" हा अट्टाहास..!!

पूर्वेकडे हळूहळू तांबूस रंगाची लय उमटायला लागली होती. सुवेळा माचीचा बेलागपणा दृष्टीस पडत होता.पक्ष्यांची किलबिल कानी पडत होती.बहिणाबाईंच्या कवितेनुसार , त्या डोंगर दर्यात सूर्यनारायण नव्याने जन्म घेत होते.जसे पेरणीनंतर पेरलेल्या बियांना ओलावा भेटला कि अंकुर जमिनीची छाती चिरून बाहेर येतो , या उघड्या आकाशाला जगायला..!! तसेच सूर्यनारायण हळूहळू आपले अस्तित्व जगाला सांगायला तयार होत होते. हा-हा म्हणता तो तांबूस रंगाचा गोळा हे अवघं आसमंत काबीज करण्याच्या तयारीत होता अन आम्ही जमेल तेवढा हा न संपू वाटणारा क्षण-सुर्यादय डोळ्याच्या खोबणीत साठवून ठेवण्याच्या निष्फळ प्रयत्नात होतो..!!
रात्रभर चाललेला क्षीण आपसूक कापरासारखा उडून गेला..!!
त्या सूर्याचा उदय आम्हाला आमच्या जीवनात नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद मात्र जागवून , हे उभं विश्व गिळंकृत करण्याच्या तयारीला लागला..!!

काहीतरी गवसल्याच सुख चेहऱ्यावर घेऊन स्मित हास्य करत , पाय नव्या जोमानं गड उतरायला घाई करत होते..!!

©सोमनाथ रा. मोहिते

No comments:

Post a Comment

Campus स्टोरी ( Part 2)

"मला माहितीये ती वैनीच होती,दादा तुझी कॉलेजातली गोष्ट पहिल्यापासून सांग कि...!!" "हो सांगतो पुढं हळूहळू...हे तर ऐक..!!...